पुणे: पुणे ते शिरुर हायवेवर मेट्रो सुविधेसह दुमजली एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून 7547.60 कोटी रुपयांच्या निविदा सुचना अखेर प्रसिद्ध केल्या असल्याची माहिती भाजप नेते आणि पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना धन्यवाद दिले आहेत.
या पूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने पुणे – शिरुर या 67 कि. मी. लांबीच्या रस्त्यावरील प्रस्तावित दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नगर रस्त्याचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी एक मोठे पाऊल समजले जाते. गेल्या काही महिन्यांपासून पुणे – शिरुर रस्त्याच्या कामासाठी अनेक बैठका झाल्या होत्या. विविध पर्यायांचा विचार करण्यात येत होता. भूसंपादन करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दुमजली पुलांसह 18 पदरी रस्ते करण्याचा पर्याय निवडण्यात आला. त्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण पार पडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी अखेरीस दुमजली पुलांसह 18 पदरी रस्ते करण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर या रस्त्याच्या प्रस्तावाच्या कामाला गती मिळाली होती.