पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून, मारणेचा गुन्हे शाखेच्या पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. मोहोळ याच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून गणेश मारणेचे नाव पुढे आल्यानंतर मारणे पुन्हा चर्चेत आला आहे.
पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गणेश मारणे आणि गजानन मारणे या दोन मोठ्या टोळ्या सक्रिय आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांपासून गणेश मारणे फारसा चर्चेत नव्हता. गणेश आणि गजानन दोघेसुद्धा मूळचे मुळशी तालुक्यातील आहेत. ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा चौकात संदीप मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. संदीप मोहोळचा खून गणेश मारणे आणि साथीदारांनी केल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. गणेश मारणे हा मूळचा मुळशी तालुक्यातील आहे. पुण्यात तो एरंडवणेतील खिलारेवाडी वसाहतीत राहायला होता. मोहोळ खून प्रकरणानंतर मारणे मोठ्या प्रमाणात चर्चेत आला.
त्यानंतर संदीप मोहोळचा खून वर्चस्व आणि वैमनस्यातून झाल्याचे तपासात उघडकीस आनेच ले होते. बाबा बोडके टोळीची धुरा सांभाळणाऱ्या संदीपने प्रतिस्पर्धी टोळीतील म्होरक्यांना कायमचं संपवून गुन्हेगारी विश्वात त्याचा दबदबा निर्माण केला होता. कोंढव्यातील कमेला या भागात संदीप मोहोळ आणि साथीदारांनी शुक्रवार पेठेतील अनिल मारणेचा खून केला होता. त्यानंतर मोहोळचे गुन्हेगारी विश्वातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी गणेश आणि सचिन पोटे यांनी मोहोळच्या खुनाचा कट रचला.
संदीप मोहोळचा खून केल्यानंतर गणेश चर्चेत आला होता. त्यानंतर मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ आणि साथीदारांनी तयारी सुरू केली होती. २०१० मध्ये निलायम चित्रपटगृहाजवळील एका उपहारगृहात किशोर मारणेचा शरद मोहोळ आणि साथीदारांनी खून केला. किशोर मारणे हा गणेश मारणेचा जवळचा साथीदार होता. वीस वर्षानंतर गणेश मारणे, त्याचा साथीदार विठ्ठल शेलार यांनी किशोर मारणेच्या खुनाचा बदला घेतल्याची चर्चा सध्या गुन्हेगारी विश्वात सुरू आहे.
संदीप मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणेसह १७ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल चौदा वर्षांनी लागला. संदीप मोहोळ खून खटल्यात सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र, गणेश मारणेसह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.