राजगुरुनगर: 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर आयोध्या लोकार्पण या ऐतिहासिक घटनेच्या काळात सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली पदे बाजूला ठेवून केवळ श्रीराम भक्त म्हणून मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवून सेवा कार्य करावे. आपल्या प्रत्येकाच्या गावातील मंदिरात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करावा, असे आवाहन शरद बुट्टे पाटील यांनी केले.
राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली पदे बाजूला ठेवत फक्त श्रीराम भक्ती या नात्याने आज स्वच्छता अभियान राबवले. यावेळी समारोप प्रसंगी बुट्टे पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी महिलांना मार्गदर्शन केले.
रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, 22 तारखेला प्रभू श्रीराम मंदिराचे भव्य उद्घाटन होत असताना आपापल्या परिसरातील मंदिरे स्वच्छ करून, घरांवर प्रभू श्रीरामांचे झेंडे लावून, अंगणात रांगोळ्या व रात्री दीपोत्सव साजरा करावा.
संपूर्ण जगात हिंदू धर्मासाठी अस्मितेचा प्रश्न असलेले प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण येत्या 22 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला अयोध्येला जाता येणार नाही. मात्र, त्यानिमित्ताने आपापल्या भागात कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष कल्पना पाटील गवारी, जिल्हा उपाध्यक्ष शिवकालीन खेंगले, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.मालिनी शिंदे, शहराध्यक्ष दीप्ती कुलकर्णी, चाकण शहराध्यक्ष अरुणा पगारे, सरपंच शितल काळूराम पिंजण आणि असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, विधानसभा तालुका संयोजक काळूराम पिंजण, पाटील बुवा गवारी, तालुका कार्याध्यक्ष प्रीतम अण्णा शिंदे, तालुका सरचिटणीस अक्षय पऱ्हाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदेश जाधव, प्रदेश पदाधिकारी अमर बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.