पुणे : अज्ञात व्यक्ती तुम्हाला फोन करून पोस्टाचे किंवा बँकेचे कुरिअर आले आहे, असं सांगून कुरिअर बाॅयला फोन करा, असं म्हणत असेल तर सावधान! कारण संबंधित कुरिअर बाॅयला फोन केला तर तुमचा फोन हॅक झालाच म्हणून समजा. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे मेसेज येण्याचे प्रमाणात वाढ होताना दिसत आह। सायबर पोलिसांकडे गेल्या दोन दिवसांत पाच ते सहा तक्रारी आल्या आहेत.
तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणीच्या नावाने व्हाॅट्सॲपवर मेसेज येतात आणि तुमच्याकडे पैशाची मागणी केली जाते. अशा मेसेजला प्रतिसाद देऊन पैसे पाठवायचा विचार केलात तर जाळ्यात अडकाल! सायबर चोरटे तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या व्हाॅट्सॲप क्रमांकाचा ॲक्सेस मिळवतात आणि त्यांच्या संपर्क यादीतील सर्वांना एकाचवेळी मेसेज पाठवतात.
आर्थिक फसवणुकीसाठी सायबर चोरटे दररोज नवनवीन फंडे शोधत आहेत. टास्क फ्राॅड आणि फेसबुक हॅक करून पैशाची मागणी करणाऱ्या मेसेजचा फंडा आजमावल्यानंतर आता पोस्ट किंवा बँकेचे कुरिअर आले आहे, असा फोन करून व्यक्तींच्या व्हाॅट्सॲपचा ॲक्सेस करून आर्थिक फसवणुकीची नवीन पद्धत शोधली आहे.
नेमकं काय घडलं?
तुमचे एक कुरिअर आले आहे, असा फाेन ऐन कामाच्या वेळेस एका महिलेला आला. मग त्यांनी त्या व्यक्तीला घरी पाठवा असं त्या म्हणाल्या.समोरचा व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होता. एक माणूस कुरिअर द्यायला येणार आहे. त्याला तुम्ही फोन करा, असे सांगून त्याने सादर महिलेला मेसेज करून एक क्रमांक पाठवला. त्यानंतर त्या महिलेने नंबरवर काॅल केला. पण लागला नाही.
नंतर चोरट्याने *401# असे करून क्रमांक डायल करायला सांगितला आणि त्या व्यक्तीचा फोन लागला, मात्र कुणीच बोलले नाही. त्यानंतर महिलेचे इनकमिंग काॅल्स बंद होऊन त्यांच्या काॅन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज गेले होते. महिलेच्या लक्षात आलं की, आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मीनल पाटील यांनी सांगितलं की, कुरिअर आल्याचा एक फोन येतो आणि *401# नि एक मोबाइल क्रमांक टाकायला सांगितला जातो. त्यामुळे तुमचे फोन आणि मेसेजेस त्या दिलेल्या क्रमांकावर फाॅरवर्ड केले जातात. त्यानंतर तुमचे व्हाॅट्सॲप दुसरीकडे सायबर चोरटे ॲक्सेस करतात. अशा प्रकारे व्हाॅट्सॲप हॅक होत आहे.
पैशाची मागणी करणारा ओळखीच्या क्रमांकावरून मेसेज आला तर तातडीने रिपोर्ट करा आणि क्रमांक ब्लाॅक करा. दोन ते तीन दिवसांपासून अशा तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुणीही सांगितले तरी *401# हा क्रमांक आणि त्यांनी सांगितलेला क्रमांक डायल करू नका.