पुणे : किरकोळ कारणावरून गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. दारु पिताना धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारुन खून केल्याची गंभीर घटना कात्रज येथील भाजी मंडई येथे शनिवारी (ता. १३) सकाळी घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी तळजाई पठार जंगलातून अवघ्या आठ तासांत अटक करून, बेड्या ठोकल्या आहेत.
किसन छगन मरगळे (वय-२१, रा. साईनगर, गल्ली नं. ३, आंबेगाव बु.) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मनोहर बागल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मृत मनोहर यांचा मुलगा महादेव मनोहर बागल (वय-२९, रा. शिवशंभो नगर, कात्रज कोंढवा रोड, पुणे) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कात्रज येथील संतोषनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मनोहर बागल यांचा मृतदेह आढळून आला होता. बागल यांच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन त्यांचा खून करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी किसन मरगळे हा तळजाई पठार जंगलात लपून बसला आहे. पथकाने जंगलात आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केवळ आठ तासांत आरोपीला अटक केली.