युनूस तांबोळी
पुणे : मराठी पत्रकार परिषद, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कार पुणे विभागातून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाला देऊन सन्मानित करण्यात आले. या निवडीमुळे सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील व जिल्ह्यातून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अभिनंदन होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहुरगड येथे मराठी पत्रकार परिषद, मुंबई व माहूर जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पत्रकार संघ व पत्रकारांना गौरविण्यात आले.
या वेळी सी.एन.एन. न्युजच्या ब्युरो चीफ विनया देशपांडे, किनवट माहूर विधासभेचे आमदार भीमराव केरामन, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, भाजपचे समन्वयक रामदास सुमठाणकर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पाबळे, किरण नाईक, निवेदिका विनया देशपांडे, नांदेड जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी, माहूर तालुका अध्यक्ष सर्फराज दुसाणी, मिलींद अष्टिवकर, विजय जोशी आदी राज्यातील पत्रकार संघ व पत्रकार उपस्थित होते.
शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने कोरोना काळात गौरवशील काम केले आहे. लोकनाट्य तमाशा, वाद्य कलाकार तसेच सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य देऊन जगण्याचे बळ निर्माण करून दिले. पत्रकारांची आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली. अपघात व इतर कारणांनी मृत पावलेल्या पत्रकारांना मदतीचा हात दिला. संघटन व पत्रकारिता बळकटीकरण करण्याचे काम केल्यामुळे पुणे विभागातून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाला वसंतराव काणे राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर, अध्यक्ष संजय बारहाते, जिल्हा प्रतिनीधी युनूस तांबोळी, समन्वयक पोपट पाचंगे, सतीष धुमाळ, धर्मा मैड, धनंजय तोडकर, सिंकदर तांबोळी, महादेव साकोरे, नवनाथ रणपिसे, गणेश थोरात, शरद राजगूरू, अमिन मुलाणी, मारूती पळसकर, विलास रोहिले, देवीदास पवार आदी उपस्थित होते.
राज्यात पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना जीवन गौरव, रंगा आण्णा वैद्य व वसंतराव काणे आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरवणी, नवीन वर्षाच्या दिनदर्शिकांचे प्रकाशन करण्यात आले.
पत्रकारांच्या योजना व संरक्षणासाठी अखंडीत लढणार : एस. एम. देशमुख
मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेली ८५ वर्षे पत्रकारांच्या समस्या व अडचणी घेऊन न्याय्य हक्कासाठी लढत आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले पहाता यासाठी समाजातून पाठबळ देण्यासाठी निषेध व्यक्त केला जात नाही. मात्र, पत्रकारांकडून मोठ्या अपेक्षा ठेवून काम करून घेतले जाते. कोरोनो काळात राज्यात १५६ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र, शासनाने आजतागायत त्यांना मदत केली नाही. पत्रकार आरोग्य, पेन्शन, पुरस्कार योजना पत्रकारांसाठी एकत्रित करून आणल्या. त्यासाठी शासनाने ५० कोटी रुपये निधी देऊन त्याच्या व्याजातून या योजना राबवितात. यामध्ये तांत्रिक अडचणी व निधी कमी पडत आहे. यासाठी थेट आर्थिक अर्थसंकल्पात तरतूद करून या योजना सुरू ठेवल्या पाहिजे, अशी आग्रहाची मागणी आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भविष्यात १ कोटी निधी उभारून पत्रकारांना मदत करण्याचे काम करण्यात येईल. पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी मराठी पत्रकार परिषद सातत्याने लढत असल्याचे देशमुख यांनी या वेळी सांगितले.