लातूर : लातूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. उदगीर तालुक्यात १४ वर्षीय शाळकरी मुलाचा ठेचून खून करण्यात आला आहे. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चेहरा विद्रूप करून आणि एक पाय तोडून टाकला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून मोबाईल चोरीच्या संशयावरुन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अरविद पवार यांनी सांगितले.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शाळकरी मुलगा संतोष गोविंद घुगे (वय १५, रा. कुमठा खु. ता. उदगीर) असं खून करण्यात आलेल्याचं नाव आहे. तो नववीच्या वर्गात शिकत होता. करण ज्ञानीवा देवनाळे (वय २८ रा. पिपरी ता. उदगीर) याला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून चार दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
एक पाय तोडून, चेहरा विद्रूप केला
शाळकरी मुलाचा एक पाय तोडून फेकण्यात आला आहे. चेहरा विद्रूप केल्यामुळे मुलाची ओळख पटणे अवघड झाले होते. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, रवींद्र तारु, तुकाराम चेरले, पोलीस नायक नाना शिदे, व्यंकट शिरसे यांनी सहकार्य केले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविद पवार पुढील तपास करीत आहेत.