नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी रविवारी १४ जानेवारी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू करणार आहेत. हा प्रवास मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. या काळात राहुल गांधी ६ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. हा प्रवास तब्बल दोन महिने चालणार आहे. यात्रा पूर्व ते पश्चिम दिशेने १५ राज्यांमधून जाईल आणि मुंबईमध्ये समाप्त होईल. लोकसभा निवडणुकीच्या आधी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय हे मुद्दे यात्रेच्या माध्यमातून उपस्थित करणार आहेत.
राहुल गांधी ६० ते ७० जणांसह पायी आणि काही ठिकाणी बसनं प्रवास करतील. दुपारी १२ वाजता मणिपूरमधील खोंगजोम वॉर मेमोरियल येथून हा प्रवास सुरू होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. यात्रा तब्बल ६,७१३ किलोमीटर अंतर पार करणार आहे.
मात्र, ‘भारत जोडो यात्रे’प्रमाणे सर्व अंतर पायी न कापता, बराचसा प्रवास बसने केला जाईल, तसेच काही अंतर पायी चालले जाईल. सुमारे ६७ दिवसांच्या कालावधीत ११० जिल्हे, १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाईल. २० किंवा २१ मार्चला यात्रा मुंबईत पोहचेल.
दरम्यान, राहुल गांधी ठिकठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील. ६७व्या दिवशी यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल गांधी पत्रकार परिषदेला संबोधित करू शकतात. खंगजोम वॉर मेमोरियल हे एक ऐतिहासिक स्मारक आहे, ज्याचं उद्घाटन २०१६ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारच्या काळात केलं होतं. १८९१ मध्ये झालेल्या शेवटच्या अँग्लो-मणिपूर युद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ हे ऐतिहासिक स्मारक बांधलं गेलं आहे.
भारत जोडो न्याय यात्रेत १५ राज्यांतील ११ जिल्ह्यांचा समावेश
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा देशातील १५ राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेत ११० जिल्हे, १०० लोकसभेच्या जागा आणि ३३७ विधानसभा जागांचा समावेश असेल. या कालावधीत हा प्रवास ६७१३ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रातील मुंबईत येऊन इथेच समाप्त होईल.
कोणत्या राज्यातून किती प्रवास?
- मणिपूरमध्ये एका दिवसात चार जिल्ह्यांमधून १०७ किलोमीटरचा प्रवास.
- नागालँडमधीळ ५ जिल्ह्यांमध्ये २५७ किलोमीटरचा दोन दिवसांत प्रवास.
- आसामच्या १७ जिल्ह्यांमध्ये ८३३ किलोमीटरचा प्रवास ८ दिवसांत.
- अरुणाचल प्रदेशमध्ये ५५ किमीचा प्रवास एका दिवसात.
- मेघालयमध्ये ५ किमीचा प्रवास एका दिवसात.
- पश्चिम बंगालमध्ये सात जिल्ह्यांमधून ५२३ किमीचा प्रवास ५ दिवसात.
- बिहारमध्ये 7 जिल्ह्यांतून 425 किमीचा प्रवास 4 दिवसांत.
- झारखंडमध्ये 8 दिवसांत 13 जिल्ह्यांमध्ये 804 किलोमीटरचा प्रवास.
- ओडिशात 341 किलोमीटरची यात्रा चार दिवसांत चार जिल्ह्यांमध्ये.
- छत्तीसगडमध्ये सात जिल्ह्यांतून 536 किलोमीटरचा पाच दिवसांचा प्रवास.
- उत्तर प्रदेशात 11 दिवसांत 20 जिल्ह्यांत 1074 किलोमीटरची यात्रा.
- मध्य प्रदेशात सात दिवसांत 9 जिल्ह्यांतून 698 किलोमीटरचा प्रवास.