लहू चव्हाण
पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना जोडणारा महत्वाचा राज्यमार्ग अरुंद असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी या राज्यमार्गाचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सुरुर ते पोलादपूर हा राज्यमार्ग असून दोन्ही पर्यटन स्थळांना जोडणारा वर्दळीचा रस्ता आहे. यावर नेहमीच पर्यटक वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता अरुंद असल्याने सुट्टीच्या दिवशी आणि पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी होत असते. त्याचबरोर अपघात ही समस्या नित्याचीच झाली आहे.
त्यामध्ये अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. यावर ठोस उपाययोजना म्हणून या रस्त्याचे काही ठिकाणी रुंदीकरण अत्यावश्यक झाले आहे. या मागणीला बांधकाम विभागाने अग्रक्रम देऊन रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे.