लोणी काळभोर, (पुणे) : मुसळधार पावसाने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात शुक्रवारी (ता. ३०) पाऊने आठ वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. परिसरात अवघ्या पंधरा मिनिटात सर्वच ठिकाणी पाणीच पाणी दिसून येत होते. परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्यता वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे.
पूर्व हवेलीसह परिसराला पावसाने जोरदार तडाखा दिला. जोरदार पाऊस बरसतच असून या पावसामुळे घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच धावपळ झाली. पावसामुळे शहरातील रस्ते पाणी पाणी झाले होते.
मागील आठ दिवसांपासून कधीतरी पाऊस येत होता. हे चित्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून असेच कायम आहे. गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी दिवसभर उनाचे सावट कायम होते. मात्र सायंकाळी पाऊने आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार पावसाने पूर्व हवेलीसह परिसरात मुसळधार हजेरी लावली. आठ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एकसारखा असल्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे