पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ऑक्टोबरमध्येच खुनी हल्ला होणार होता. मात्र, त्यावेळीच खुनी हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर हल्लेखोरांची आरोपी वकिलांसोबत पिरंगुट परिसरात बैठक झाल्याचे तपासात समोर आले आहे. या दोन्ही वकिलांना शरद मोहोळ याच्या खुनामागचा मुख्य सूत्रधार माहीत आहे, असा दावा तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात केला आहे.
दरम्यान, रवींद्र पवार आणि संजय उडान या दोन आरोपी वकिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तसेच नव्याने अटक केलेल्या धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे या दोन आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी वकिलांना आणि त्यांच्या नवीन २ आरोपींना गुन्हे शाखेने गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी ही नवीन माहिती समोर आली आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणातील हल्लेखोर आरोपींनी ऑक्टोबरमध्ये मोहोळ याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि नामदेव महिपती कानगुडे या आरोपींनी दोन्ही आरोपी वकिलांसोबत पिरंगुट परिसरात बैठक देखील घेतली होती. हे आरोपी नेमके कुठे भेटले, त्यांच्यासोबत आणखी कोण होते, याचा शोध घ्यायचा आहे.
मोहोळचा खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात असताना आरोपी वकील त्यांना भेटले. तिथेच आरोपींनी जुने सीमकार्ड टाकून देत नवीन सीमकार्डवरून एका व्यक्तीला फोन केला होता, असं गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात माहिती दिली.