पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर पुणे शहरात देशभक्त असा उल्लेख करत श्रद्धांजलीपर बॅनर विविध भागांत लावण्यात आले आहेत. बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून पुढील आदेश देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे गुंड शरद मोहोळ याच्या श्रद्धांजली बॅनरवरून पोलिसांऐवजी अजित पवारच अॅक्शन मोडवर आल्याच दिसत आहे.
पुणे शहरातील गुंड शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर शहरातील विविध भागांत श्रद्धांजलीपर बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनरवर मोहोळचा उल्लेख देशभक्त म्हणून करण्यात आला असून, पोलिसांकडून अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांना याबाबत कुठलीच कल्पना नसल्याचे सांगत तातडीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी बोलून बॅनर लावणाऱ्यांबाबत कारवाईचे आदेश देण्यात येतील असं अजित पवार यांनी सांगितले. तसेच शहरासह जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत माहिती प्राप्त झाल्यावर तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत माझे प्रथम प्राधान्य राहील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.