पिंपरी : महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. जप्तीपूर्व नोटीस बजावूनही कराचा भरणा न करणाऱ्या २०० थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, तर १७ थकबाकीदारांचे नळजोड खंडित केले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघा अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने महापालिकने ही कारवाई सुरू केली आहे.
करसंकलन व करआकारणी विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत ६८० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप अडीच महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या कालावधीत जास्तीत जास्त करवसुली करण्यासाठी जप्ती मोहीम, नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र, मोकळ्या जमीनी अशा सहा लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महापालिकेने एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३३ हजार २४१ मालमत्ताधारकांना जप्ती नोटिसा पाठविल्या. या मालमत्ताधारकांकडे ५८४ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली आहे. जप्तीचे नोटीस पथक घराच्या दारात पोहोचल्यानंतर सात हजार ८० जणांनी ७३ कोटी २८ लाखांचा कर भरला आहे, तर २०० मालमत्ता जप्त केल्या आहेत.
फुगेवाडी, सांगवीत सर्वाधिक मालमत्ता जप्त
आकुर्डी विभागात ३, किवळे ३२, चऱ्होली ४, चिंचवड १४, चिखली १६, थेरगाव १८, दिघी १, निगडी प्राधिकरण ३, फुगेवाडीत ३८, भोसरी १६, महापालिका भवन विभागातील सहा, मोशी २९, वाकड ७ आणि सांगवी विभागातील १३ अशा २०० मालमत्ता जप्त केल्या आहेत.
कठोर कारवाई करणार
थकबाकीदारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. २०० मालमत्ता जप्त केल्या आहेत.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करसंकलन व करआकारणी विभाग