पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेने देखील बैठका, चर्चा, सभांचा धडाका लावला असतानाच पुण्यात मनसेला खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. भाजपच्या शनिवारी (ता. ६) झालेल्या सुपर वॉरियर्स बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मनसेचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या पक्षप्रेवशप्रसंगी जानेवारी महिना पक्ष प्रवेशासाठी दिला आहे. येत्या काळात मोठे भूकंप होणार आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या वेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश करून घेण्याची जबाबदारी टाकली आहे. गेल्या २५ वर्षांत जे आमदार झाले, खासदार झाले, निवडणुकांमध्ये पडले असले तरीही अशा नेत्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना सक्रीय करा, असे आदेश पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, त्यामुळे तुम्ही कामाला लागा, अशा सूचना नेते तसेच कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.