ठाणे : ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बंदूक साफ करताना एका व्यक्तीकडून चुकून गोळीबार झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. ६ जानेवारीला संध्याकाळी ही घटना घडली. एक 50 वर्षीय फॅब्रिकेटर आणि इतर दोन जण त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरची साफसफाई करत असताना चुकून गोळी लागल्याने बिपिन जैस्वाल (21) आणि राहुल जैस्वाल (23, दोघे रा. रुपादेवी पाडा, वागळे इस्टेट) हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मोहम्मद उमर शेख (50) यांच्या मालकीच्या राम नगर वागळे इस्टेटमधील त्यांच्या दुकानात संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जवळच्या लोकमान्य नगर येथील रहिवासी असलेल्या शेख यांना शस्त्राच्या आत गोळी असल्याचे लक्षात आले नाही आणि त्यांनी चुकून ट्रिगर दाबला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले.
जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. श्रीनगर पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बंदूक साफ करताना चुकून गोळीबार होण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे परवानाधारकांनी बंदूक साफ करताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. असं आवाहान पोलिसांनी केलं आहे.