पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरात शुक्रवारी भरदिवसा चार हल्लेखोरांनी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या केली. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ माजली. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे.
मोहोळ हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांचे नाव समोर आले आहे. हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या या साथीदारांनी जेवण केले होते. यानंतर सर्व जण घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर काय झाले ते दोन वकिलांनी सांगितले. हे बोलताना त्यांना रडू कोसळले.
कोर्टात काय म्हणाले वकील
आम्हाला आरोपींचा फोन आला आणि ते म्हणाले, आम्ही खून केला आहे. पोलीस ठाण्यात हजर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला दिला. त्याप्रमाणे त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळवली. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील आम्ही तेच सांगितले. परंतु, त्यांनी आमचे ऐकले नाही, या शब्दांत एका वकिलाने आपली बाजू मांडली.
आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून वकिली करत आहोत. आम्ही काहीही केलेली नाही, असे सांगताना दुसऱ्या वकिलास रडू कोसळले. एक वकिल न्यायालयात रडायला लागला तेव्हा तुम्ही काहीच केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही, असे सांगत न्यायालयाने त्यांना आश्वस्त केले.
दरम्यान आरोपींना कोर्टात आणताना बार असोसिएशनचे सदस्य आणि वकिलांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आरोपींना कोर्टात हजर करणेही अवघड झाले. त्यावर न्यायालयाने इतर वकिलांना बाहेर जाण्याची सूचना केली. मात्र, त्यानंतरही गर्दी कमी झाली नाही. यामुळे न्यायालयाने बार असोसिएशनच्या विरोधात ऑर्डर देण्याबाबतचे पाऊल देखील उचलले.
या आरोपींना आणले तेव्हा न्यायालयात मोठा बंदोबस्त होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वकिलांचा सहभाग सिद्ध होणे आवश्यक असल्याचे सांगत रवींद्र पवार आणि संजय उडाण यांनी दोन्ही वकिलांना आठ जानेवारीपर्यंत तर इतर सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.