पुणे : पुणे शहरात मेघगर्जना विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील काही दिवसात थंडीचा कडाकाही वाढणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. गेले काही दिवस ढगाळ हवामानही आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात बदल होत आहे. सध्या थंडीचा कडाका कमी झाला आहे.
शनिवारी ६ जानेवारीला किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. उपनगरातही किमान तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. शनिवारी पाषाण येथे १२.३ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. तर एनडीए १२.८, कोरेगाव पार्क १७.८, मगरपट्टा १९ तर वडगावशेरी येथे २० अंश सेल्सिअस इतके तापमान होते. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये आणि जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी ६ जानेवारीला पाऊस पडला. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान कमी झाले असून ते २९.५ अंश सेल्सिअसवर आलेल आहे.
दरम्यान, येत्या ७ जानेवारी दरम्यान, आकाश अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. सकाळी धुके पडणार आहे. शहरात अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तसेच ८ आणि ९ जानेवारीला मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पुणे शहर परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असून सकाळी धुके असणार आहे.