सागर घरत
करमाळा : तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या उजनी जलाशयाच्या परिसरातील टाकळी येथील तळ्यातील तब्बल तीन टन मांगुर मासा नष्ट करण्यात आला आहे. मत्स्याविभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप वीरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या परिसरात अजून अनेक प्रतिबंधित मांगुर मासा संवर्धन तलाव चालू असून या ठिकाणीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विरकर यांनी पत्रकारांना दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोपनीय माहितीनुसार टाकळी परिसरात प्रतिबंधीत मांगुर मत्स्यपालन व मत्स्यसंवर्धन तलाव असल्याची माहिती मस्यविभागाला मिळाली. त्यानुसार मस्य संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त पी.जी. वीरकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक मस्य विभागीय अधिकारी आर. एस रावणगावे, व्ही.एस. वाघमोडे, एस.टी. घाडगे, एस. आर. मगदूम, के. एन. सौदाने, डि, बी. सरडे आणि भीमा उपसा सिंचन विभागाचे कर्मचारी यांनी टाकळी भागात तलावांची तपासणी केली.
यामध्ये ऋषिकेश करचे, गोरख मोरे यांच्या तलावात मांगुर मास्यांचे संवर्धन होत असल्याचे आढळून आले. यावेळी पथकाने या तलावाच्या शेजारीच खड्डा घेऊन तब्बल तीन टन मांगुर मासा गाडून नष्ट करण्यात आला. यावेळी हवालदार मारुती रणदिवे, प्रशांत गायकवाड, पोलीस पाटील सोमनाथ कुचेकर आदी अधिकारी उपस्थित होते. मत्स्य विभाग सोलापूर, पाटबंधारे विभाग, तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली.
मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने मांगूर माशाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घातलेली आहे.असं असतानाही मांगुर माशांचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे ही कारवाई केली जात आहे.
उजनी जलाशयाकाठी बेकायदेशीर रित्या चालू असलेल्या मांगुर मत्स्य संवर्धन तलावावर कारवाई करण्यात आली आहे. मानवाला तसेच पर्यावरणाला मांगुर माशामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मांगुर मांशाचे उत्पादन व विक्रीला बंदी घातली आहे. त्यामुळे मांगुर व्यवसाय करणार्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
प्रदीप वीरकर, सहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग, सोलापूर