पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ परिसरातून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शरद मोहळ खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये संतोष पोळेकर आणि त्याचे साथीदार आणि मास्टरमाईंड नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा याला देखील अटक करण्यात आली आहे. ही हत्या शरद मोहळसोबत असलेल्या पैशाच्या आणि जमिनीच्या वादातून झाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी- शिरवळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड परिसरातील सुतारदरा येक्षील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेची ९ तपास पथके पुणे शहर, ग्रामीण परिसर, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली. सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ संशयित मोटारीचा पाठलाग करून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) याच्यासह आठ आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.