पुणे : महाराष्ट्राच्या मसाला क्वीन अशी ओळख निर्माण केलेल्या अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमलताई परदेशी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबिका मसाले घराघरात पोहोचविण्यासाठी कमलताईंनी जीवाचे रान केले. निरक्षर असूनही महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला. ब्लड कॅन्सर झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दौंड तालुक्यातील खुटबाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कमलताई परदेशी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. निरक्षर शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसालेच्या अध्यक्षा असा प्रवास अनेकांना नव्या जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा दतो. २००० साली खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मसाला व्यवसाय सुरू केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झोपडीतूनच त्यांच्या व्यवसायाची सुरवात झाली. आज त्यांच्या मसाल्यांना परदेशात देखील मागणी आहे.
शिक्षण नसले तरी जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मोठ्या कष्टाने सुरुवातीला पुण्यातील सरकारी कार्यालयाबाहेर त्यांनी मसाले विकले. उत्तम चवीमुळे अल्पावधीतच त्यांचे मसाले लोकप्रिय झाले. खवय्यांच्या पसंतीनुसार मुंबईतील प्रदशर्नांमध्ये आणि त्यानंतर बिग बाझारमध्ये मसाल्यांची विक्री केली. मसाल्याच्या उत्कृष्ट दर्जामुळे आदर्श उद्योजिका यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
जर्मनीच्या चांसेलार अँगेला मर्केल यांनीही कमलताईंच्या कामाचे कौतुक केले. एवढ्यावरच समाधान न मानता कमलाताईंच्या अंबिका मसाल्याचा सुगंध नाबार्ड बँकेपर्यंत गेला. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अँजेला मर्केल यांना बचत गट दाखवण्यासाठी नेले होते. त्यावेळी १४,५०० रुपयांचा चेक त्यांनी कमलाताईंना दिला होता. मर्केल यांनी भेटीवेळी कमलाताईंना तुमच्या अपेक्षा काय, असा प्रश्न विचारला. त्यावेळी आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्या, असे कमलताई म्हणाल्या. त्यानंतर जर्मनीत अंबिका मलाल्याची विक्री होऊ लागली. त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईतील सर्व बिग बाजारला त्यांचा माल पोहोचवण्यास मदत केली.
कमलताईंच्या साधेपणाचे कायम कौतुक होत असे. आपल्या सहकारी महिलांना त्यांना चांगली घरे बांधून दिली; मात्र, त्या आजही साध्या घरात राहत होत्या. घर ते फॅक्टरी हा प्रवास त्या पायी पूर्ण करत होत्या.