Dharavi Redevelopment Project :मुंबई : धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. त्यामुळे पुनर्विकासासाठी अदानी समूहाचा नेमका प्लान काय? असणार याकडे देशभराचे लक्ष लागले आहे. अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलेपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून पुनर्विकासाचे नियोजन आणि रचनेच्या कामासाठी जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची नेमणूक करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने अमेरिकेतील, ब्रिटनमधील कन्सल्टेन्सी फर्म बुरो हॅपोल्ड आणि आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.
सासाकी आणि बुरो हॅपोल्ड या कंपन्या शहर नगरचना आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या आहेत. त्याशिवाय, सिंगापूरमधील तज्ज्ञ लोकांची एक टीमदेखील प्रोजेक्ट टीमसोबत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये अदानी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अदानी प्रॉपर्टीजने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वात मोठी बोली लावली होती. डीआरपीपीएलमध्ये अदानी समूहाची 80 टक्के आणि महाराष्ट्र सरकारची 20 टक्के भागिदारी आहे. अदानी समूहाने 5069 कोटी रुपयांची बोली लावली होती.
धारावीचा परिसर हा जवळपास 600 एकर जमिनीवर फैलावला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याचा मान धारावीला मिळाला आहे. सासाकी कंपनीला 70 वर्षांचा अनुभव आहे. तर बुरो हॅपोल्ड कंपनीला क्रिएटीव्ह आणि मूल्यवान पायाभूत सुविधांसाठी ओळखले जाते. त्याचप्रमाणे, हाफीज कॉन्ट्रॅक्टर हे मुंबईतील गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांसाठी ओळखले जातात.
डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, धारावी पुनर्विकास प्रकल्प ही केवळ पुनर्विकास योजना नाही. धारावीत राहणाऱ्या लोकांची गुणवत्ता सुधारणे हा आमचा उद्देश आहे. यामध्ये आम्ही कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या प्रकल्पासाठी सिंगापूर प्रेरणादायी ठरेल. 1960 च्या दशकात सिंगापूरची परिस्थिती आजच्या धारावीसारखी होती. पण आज सिंगापूर हे संपूर्ण जगासमोर उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले.