दीपक खिलारे
इंदापूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने इंदापूर पंचायत समितीच्या आवारात सोमवारी (ता. १) जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांसमवेत ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य न केल्यामुळे व्यथीत होऊन, पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी इंदापूर पंचायत समिती कार्यालयावर आज ‘जेल भरो’ आंदोलन केले.
अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आपल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येतील, असे आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा
पंचायत समिती येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आलेल्या ‘जेल भरो’ आंदोलनास भारत राष्ट्र समितीचे इंदापूर तालुका समन्वयक निवास शेळके, राष्ट्र सेवा दलाचे राज्य समन्वयक गफूर सय्यद, समता सैनिक दलाचे अशोक पोळ यांनी जाहीर पाठिंबा दिला.