सागर जगदाळे
भिगवण : जियो डिजिटल फायबर कंपनीकडून फायबर केबल टाकण्याच्या मोबदल्यात भिगवण ग्रामपंचायतला साडे चार लाख रुपये कर स्वरूपात मिळाल्याची माहिती सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी दिली. ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तुषार क्षीरसागर आणि जावेद शेख यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात जियो डिजिटल फायबर कंपनीने जियो मोबाइल टॉवर ते भिगवण-राशीन रोड या रस्त्याच्या कडेने भुयारी पद्धतीने फायबर केबल टाकण्याचे काम सुरू केले. याबाबत माहिती मिळताच तुषार क्षीरसागर आणि जावेद शेख यांनी या कामाची चौकशी केली. सदरचे काम हे ग्रामपंचायतची परवानगी न घेता तसेच ग्रामपंचायत हद्दीत खोदाईचा कर न भरता कंपनीने सुरू केले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी हे काम तात्काळ थांबविण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, ग्रामपंचायत परवानगी आणि शासकीय नियमानुसार कर भरणा केल्याशिवाय काम सुरू करू नये, असे संबंधित ठेकेदाराला सांगितले. त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायतकडे परवानगीसाठी अर्ज केला. त्यानंतर ग्रामपंचायतने कर मागणी पत्र त्यांना सादर केले. त्यानुसार कंपनीने साडे चार लाख रुपये ग्रामपंचायत खात्यावर वर्ग केल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. तुषार क्षीरसागर आणि जावेद शेख यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने ग्रामपंचायतचा फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत.