पुणे : घरांच्या वाढलेल्या किंमती आणि गृहकर्जाचे वाढलेले दर असे चित्र या वर्षाच्या सुरुवातीला दिसून आल्या नंतरही घरांच्या विक्रीत यंदा मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. भारतातील प्रमुख महानगरांमध्ये यावर्षी 4 लाख 76 हजार घरांची विक्री झाली आहे. फक्त पुण्यात 86 हजार 680 घरे विकली गेली आहेत. पुण्यातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 52 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. अनारॉक ग्रुपने प्रमुख सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. अनारॉक ग्रुपच्या अहवालानुसार, मुंबईत सर्वाधिक 1 लाख 53 हजार 870 घरांची विक्री झाली आहे. त्यानंतर पुण्यात 86 हजार 680 घरांची विक्री झाली.
गेल्या वर्षी पुण्यात 57 हजार 145 घरांची विक्री झाली होती. मात्र, यावर्षी देशातील घरांच्या बाजारपेठेत मुंबई आणि पुण्याने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच नवीन बांधकाम प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाणही मुंबई आणि पुण्यात जास्त आहे. एकूण नवीन प्रकल्पांपैकी जवळपास 54 टक्के या दोन शहरांत आहेत. देशात पुढील वर्षात घरांच्या किमतीत सरासरी 8 ते 10 टक्के एवढी वाढ अपेक्षित आहे. यंदा दुसऱ्या सहामाहीत व्याजदर स्थिर राहिल्याने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी सकारात्मक वातावरण कायम राहिले. देशात महागाईचा दर सध्या स्थिर आहे. तसेच येणाऱ्या काळात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचीही जोरदार प्रगती सुरू असून आगामी काळात घरांना वाढती मागणी राहणार आहे, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.