गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. त्याला अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे. जीवितलाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
नुकतेच वडगाव बांडे- मेमाणवाडी (ता. दौंड) येथे बिबट्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीकांत पारखी यांच्या घराशेजारी कोंबड्यांसाठी लावलेल्या जाळीवर हल्ला करत त्यामधील पंधरा कोंबड्यांचा जागीच फडशा पडला. उर्वरित कोंबड्यांनी झाडांचा फांद्यावर चढल्यामुळे त्यांचा बचाव झाला. त्यामुळे आणखी नुकसान होण्यापासून पारखी कुटुंबीयांचा बचाव झाला. या परिसरात बिबट्या आणि तीन बछडे वावरत असल्याचे पारखी कुटुंबीय व स्थानिक नागरिक यांनी सांगितले.
राहू, वडगाव बांडे-मेमाणवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वडगाव बांडे येथील सरपंच सुभाष कुलाल, श्रीकांत पारखी, अंकुशराव भरणे, भीमाजी मेमाणे, उत्तमदादा मेमाणे यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. यापूर्वी देखील केली होती. परंतु, पिंजरा लावण्यास वन विभागाकडून जाणीवपूर्वक हलगर्जी केली जाते. तसेच काही प्रस्ताव तयार करून देखील टाळाटाळ केली जाते, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
बिबट्याचे सायंकाळच्या सुमारास दर्शन
त्याच दिवशी वडगाव बांडे- राहू शिव रस्त्यावर भरदिवसा बिबट्या आणि त्यांचे बछडे वावरताना येथील ग्रामस्थांनी पाहिले. तसेच, दोन दिवसांपूर्वी सोनवणे डेअरी फार्म परिसरात उसाच्या बांधावर बिबट्या वावरताना शेतकऱ्यांनी पाहिला. सोनवणे मळा परिसरात देखील बिबट्याचे सायंकाळच्या सुमारास नागरिकांना दर्शन झाले. शेतामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या पायाचे ठसे देखील शेतकऱ्यांना आढळून आले आहे.
पिंजरे लावण्याची केली जातीये मागणी
राहू-वाघोली रस्त्याच्या कडेला बिबट्या वावरताना दिसला आहे. वाहनाच्या दिव्याच्या उजेडामुळे त्याने उसाच्या शेताकडे धूम ठोकली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे.