मुंबई : रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. तिघांनाही बडोद्यातून ताब्यात घेतलं आहे. खिलाफत इंडिया या नावाने रिझर्व्ह बँकेला एक ईमेल आला होता. सध्या संशयित आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल मंगळवारी दुपारी आला होता. दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं यामध्ये म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोधमोहीम केली असता काहीही आक्षेपार्ह असे आढळून आले नाही. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मुंबई पोलीस त्याचबरोबर गुन्हे शाखा सतर्क होऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथक तयार केले होते. 24 तासातच मुंबई पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. सध्या आता या संशयित आरोपींची चौकशी सुरू झाली असून हा मेल का केला होता आणि त्याच्या मागचा उद्देश काय? याचा मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे.