लोणी काळभोर (पुणे) : येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘रेनबो नाईट फायर कॅम्प-२०२३ʼ या एकदिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात इयत्ता ५ वी ते ९ वीतील १४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मुलांचे व मुलींचे प्रत्येकी चार गटात विभाजन करण्यात आले होते. या गटांना महापुरुषांची नावे देण्यात आली होती. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना हॉर्स रायडिंगचा आनंद देण्यात आला. त्याचबरोबर चंद्र आणि तार्यांचे दर्शन घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अथांग पसरलेल्या आकाशगंगेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी दुर्बिणीद्वारे करत होते. तसेच खगोलीय प्रश्नांची उत्तरे शिक्षकांकडून दिली जात होती.
शिवव्याख्याते जयपाल जाधव यांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या वेळी त्यांनी दिलेली गारद अंगावर रोमांच उभे करून गेली. अश्विन मनगुतकर सरांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने वातावरणातील उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचबरोबर कार्तिक गोरखे सरांनी गिटारच्या सहाय्याने सादर केलेल्या सुमधूर गाण्यांनी शिबिराचे वातावरण अतिशय उल्हसित झाले होते.
मार्गदर्शक शिक्षकांसोबत गाण्यांच्या भेंड्या, गप्पा-गोष्टींची मैफिल रंगली. दुसर्या दिवशी पहाटे चार वाजता हलके व्यायाम प्रकार घेऊन योगा, ध्यानधारणा मुलांकडून करून घेतली. त्यानंतर ‘खरा तो एकची धर्म’ आणि ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थनांनी दिवसाची अतिशय प्रसन्न सुरुवात झाली. मग मुलांना बसमध्ये बसवून रामदरा शिवालय या ठिकाणी ट्रेकिंगसाठी नेण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्रेकिंगला सुरुवात झाली. धुक्यातून वाट काढत, अंगावर थंडगार वाऱ्याचे शिडकावे घेत, मुले डोंगरमाथा चढत होती. डोंगरमाथ्यावर असणार्या मोकळ्या पटांगणात मुले जमली. शिवालय परिसरात स्वच्छतेचे काम सुरू होते. मुलांनी स्वयंस्फूर्तीने शिवालय परिसर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावला. त्यानंतर मुलांना बसमध्ये बसवून पुन्हा स्कूलमध्ये आणण्यात आले. शालेय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशी संस्कार शिबिरे नियमितपणे झाली पाहिजेत, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुलांना रेनबो स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर, मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर, ऐश्वर्या काळभोर, निखिल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.