पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती धक्कादायकरित्या वाढत आहे. नुकताच जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आपल्या अवघ्या ९ वर्षांच्या भाचीला मामीने विवस्त्र करून बेदम मारहाण केली, एवढेच नव्हे तर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून मामीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार जानेवारी ते ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला. तब्बल दोन वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादी महिलेने कोरोनाची लाट असताना तिच्या नऊ वर्षांच्या मुलीला भावाकडे राहण्यासाठी पुण्याला पाठवले होते. भाऊ हवाई दलात नोकरीला असल्याने त्याचे कुटुंब हवाई दल वसाहतीत राहते. दरम्यान, मामा कामावर गेल्यावर पत्नी नणंदेच्या मुलीला विवस्त्र करून बेदम मारहाण करत असे. याशिवाय चिमुकलीचे विवस्त्र फोटो काढून तिला जीवे मारण्याची धमकी देत होती.
दरम्यान, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर काही काळानंतर पीडित मुलगी तिच्या मूळ गावी गेल्यावर तिने मामीने केलेल्या अत्याचाराची माहिती आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर महिलेवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.