लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अंजू गुलाब गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाला निर्धारीत वेळेत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी (ता.21) याबाबत आदेश दिले आहेत. या आदेशाच्या दिनांकापासून पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास तसेच ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन २०२१ मध्ये पार पडली. या निवडणुकीचा निकाल 18 जानेवारी २०२१ ला लागला. या निवडणुकीत अंजू गायकवाड सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. निवडून आल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब विहित नमुन्यामध्ये तहसिलदार, हवेली यांच्याकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, अंजू गायकवाड यांनी निर्धारित वेळेत निवडणूक आयोगाकडे ही माहिती दिली नव्हती. या प्रकरणी आदेश अंकुश जाधव (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
दरम्यान, अंजु गायकवाड यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा खर्च तहसिलदार कार्यालय हवेली यांना सादर केला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्यास कसूर केला असून सदरचे कृत्य हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असल्याने त्यांना ग्रामपंचायत कुंजीरवाडी सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी निवडणूक आयोगाकडे अर्जाद्वारे केली होती.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ब) मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवार अंजु गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये, निर्देशित केलेल्या मार्गाने सादर केला नाही. त्यामुळे अर्जदार जाधव यांचा अर्ज निकालपत्रात दिलेल्या कारणास्तव मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. राजेश देशमुख यांनी अंजू गायकवाड यांचे पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास तसेच ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे, असे आदेश दिले आहेत.