Maharashtra Cold Weather : राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून दक्षिण भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होताना दिसत आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे.
कडाक्याच्या थंडीने परभणी जिल्हा गारठला
तसेच परभणी जिल्ह्यात देखील मागच्या 4 दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याचे तापमान 10.08 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र थंडी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे.
रब्बी हंगामातील पिकांना फायदा
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने तापमान 15 अंश पर्यंत खाली उतरले आहे. वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. पोषक वातावरणामुळे शेतीपिकांना वाढत्या थंडीचा फायदा हा कांदा, गहू, हरभरा या पिकांना होताना दिसून येत आहे.