तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून 63 भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गहाळ झाला असल्याचे उघडकीस आले आहे. मंदिर संस्थानच्यावतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख केला आहे. 2011 पूर्वीच चांदीचा मुकुट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय या तक्रारीत व्यक्त केला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे असा दुर्मिळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून गायब करण्यात आला आहे.
श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला आहे. पोलीस आता वस्तुस्थिती नक्की काय? याचा शोध घेत आहेत. दरम्यान तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर सोमनाथ माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. 7 मधील रेशमासह 43 भार वजन असलेला चांदीच्या मुकुटाचा अपहार झाला असल्याचे म्हटले आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता.
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन, दुर्मिळ आणि मौल्यवान असलेल्या अलंकारांपैकी 17 अलंकार हे खजिन्यातून गायब झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार तुळजाभवानी देवीचे महंत आहेत. तसेच या चार महंतांपैकी तीन महंत मयत असून महंत चिलोजीबुवा हे एकमेव आरोपी सध्या हयात आहेत. तत्कालीन सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला असून तेही आजघडीला हयात नाहीत. एक अज्ञात आरोपी असल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.