पुणे : पुण्यात नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. भाऊ आणि त्याच्या मित्रांनी मिळून 17 वर्षीय अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर बलात्कार केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रक्षा करणाऱ्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याने विश्वास नेमका कोणावर ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी तिघांविरोधात बलात्कार, पॉक्सो, विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार 2018 पासून 2023 पर्यंत सुरू होता.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कर्णबधिर शाळेच्या शिक्षिकेने फिर्याद दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. संबंधित अल्पवयीन मुलगी कर्णबधिर आहे. तिघांनी गोड बोलून, वेगवेगळी कारणे सांगून तिच्यावर बलात्कार केला. सागर रजाने, राहुल पाटील या दोघांनी मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि घरात शिरुन जबरदस्तीने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता याबाबत कोणाल काही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत मुलीच्या नराधम भावाने स्वत:च्या बहिणीवरच बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.