मुंबई : मुंबईमध्ये एका २१ वर्षीय मुलाने भर रस्त्यात चालताना धक्का लागल्याच्या रागातून चक्क 25 वर्षीय एका तरूणावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला चढवला आहे. ही घटना वांद्रे भागात घडली आहे. याप्रकरणी आरोपी आणि त्याचे मित्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीचं नाव वासिम अक्रम अंसारी असं आहे.
याप्रकरणी दोघाजणांना अटक केली असून निर्मल नगर पोलिस स्टेशन आणि क्राईम ब्रांच कडून कारवाई करण्यात आली आहे. हल्ला झालेल्या मुलाच्या चुलत भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल खान आणि वसीम अक्रम अन्सारी यांच्यात वाद झाला. रस्त्यातून चालताना धक्का लागला आणि त्यांच्यात बाचाबाची झाली, आणि हा वाद वाढतच गेला. वादावादीमध्ये अन्सारीने खानवर स्क्रु ड्रायव्हरने हल्ला केला. यामध्ये खानच्या डाव्या डोळ्याला जखम झाली. नंतर त्याचा चुलतभाऊ फारूख हफिज खान त्याच्या मदतीला पोहचला.
त्यावेळी अंसारी आणि त्याच्या मित्रांनी चुलत भावाला जोरदार मारलं. त्यानंतर तातडीने खान आणि फारूखला भाभा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. खानच्या स्टेटमेंट वरून पोलिसांनी अंसारी, अली सय्यद, समिर आणि एका अनोळखी व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल केला.