लोणी काळभोर : पाटबंधारे खात्याचे अधिकारी कागदी घोडे नाचवून काम झाल्याचा गाजावाजा करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात काम न झाल्याचा धक्कादायक प्रकार कुंजीरवाडी (ता.हवेली) येथे उघडकीस आला आहे. कुंजीरवाडी येथील जुना मुठा कालवा अर्थात जुना बेबी कालव्यात मागील पंधरा दिवसांपासून एरंडांची झाडे, जलपर्णी, कचरा व अतिक्रमणे ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जुना बेबी कालवा हा शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी १८६० च्यादरम्यान सुरु करण्यात आला होता. तसेच १९६० च्या दरम्यान, नवीन मुळा मुठा कालवा सुरु करण्यात आला. त्यानंतर जुना बेबी कालवा बंद पडला. बऱ्याच कालावधीत या जुना बेबी कालव्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. लोकवस्ती वाढल्याने जुन्या कालव्याच्या दोन्ही बाजूने घरे निर्माण झाली. त्यामुळे हा कालवा पूर्व हवेलीतील बहुतांश गावाच्या मध्यभागी झाला आहे.
हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने सुमारे चाळीस वर्षांपासून बंद असलेला बेबी कालवा मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. कालवा सुरू करत असताना कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे गरजेचे होते. यामध्ये कालव्याच्या आतील बाजूस वाढलेले गवत काढणे, कमी-अधिक उंची असलेल्या कालव्यांच्या भरावाची दुरुस्ती करणे व कालव्याच्या ठिकाणच्या सर्व पुलांची उंची वाढविणे अपेक्षित होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत खडकवासला पाटबंधारे विभागाने घाईघाईने कालव्यातून पाणी सोडले आहे.
डासांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कालव्यातील पाण्याची दुर्गंधी पसरली असून, परिसरात जलपर्णी बेसुमार वाढली आहे. कालव्यामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. तसेच, डासांचा उच्छाद वाढल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कालव्यापासून कुंजीरवाडी ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने खडकवासला पाठबंधारे विभागाने कालव्याची डागडुजी व स्वच्छता मागील काही दिवसांपासून सुरु केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, पंधरा दिवस उलटूनही कुंजीरवाडी येथील गावालगत असलेल्या कालव्याची स्वच्छता व डागडुजी झाली नसल्याने खडकवासला पाठबंधारे खात्याच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.
कुंजीरवाडी येथील साफसफाईचे काम सुरुच
कुंजीरवाडी येथील साफसफाईचे काम बंद नाही सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच जाऊन पाहणी केली आहे. मशीन मोठी असल्याने कालव्याच्या एका बाजूची साफसफाई केली आहे. कालव्याच्या दुसऱ्या बाजूचीही साफसफाई आज ना उद्या होईलच.
– पल्लवी जोशी, लोणी काळभोर शाखा अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
लवकरच कामाचा अहवाल मागवून घेणार
कालव्याची स्वच्छता करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या देण्यात आलेली आहे. कुंजीरवाडी येथील काम होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी का विलंब होत आहे. ते समजले नाही. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्याकडून लवकरच कामाचा अहवाल मागवून घेण्यात येईल.
– श्वेता खुराडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
१५ दिवस झाले तरी अद्याप साफसफाई नाहीच
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जुना बेबी कालवा गेला आहे. या कालव्यात जलपर्णी व झाडी मोठ्या प्रमाणात आहे. कालव्याची सगळीकडची स्वच्छता केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांना कुंजीरवाडीतील घाण दिसत नाही का? १५ दिवस झाले तरी अद्याप साफसफाई केली नाही.
– नानासाहेब कुंजीर, शेतकरी, कुंजीरवाडी, ता. हवेली.