लोणी काळभोर : वारंवार शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मारहाण करून डोक्यात दगड घातल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इराणी गल्लीत रविवारी (ता. १८) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शादाब नजीब इनामदार (वय १८, रा. पठारे वस्ती कदमवाकवस्ती, तालुका हवेली) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्बास इराणी व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार (नाव, वय व पत्ता पूर्ण माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादाब इनामदार हा पठारे वस्तीत राहतो. तर आरोपी अब्बास इराणी हा नेहमी फिर्यादी रस्त्यावरून जाताना शिवीगाळ करीत असे. नेहमीप्रमाणे शादाब हा रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी चालला होता. तेव्हा आरोपीने पुन्हा शादाब याला शिवीगाळ केली.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या शिवीगाळीला कंटाळून शादाब याने आरोपींना धाडस करून जाब विचारला. तेव्हा आरोपी अब्बास इराणी याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. तर आरोपी अब्बास इराणी याने शादाबच्या डोक्यात दगड घातला. या मारहाणीत शादाब जखमी झाला आहे.
याप्रकरणी शादाब इनामदार याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्बास इराणी व त्याच्या इतर दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.