weather update : मुंबई : काही राज्यात थंडी वाढली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिणी तमिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत.
पूर्वांचल आणि बिहारच्या अनेक भागात किमान तापमानातही सातत्याने घट होत आहे. काश्मीरमध्ये काही भागात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा कमी झाला आहे. त्याचवेळी हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात थंडी झपाट्याने वाढत आहे.
उर्वरित तामिळनाडू आणि किनारी कर्नाटकात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान-निकोबार बेटांच्या दक्षिण किनारपट्टी भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.