मुंबई : मुंबईतील अनधिकृत नर्सिंग होममधून बालकांची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अवघ्या ७ ते १० लाखांमध्ये नवजात बालकांची विक्री केली जात आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी बालकांच्या विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एक बोगस महिला डॉक्टर आणि एजंटसह पाच महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शहरातील अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून बालकांच्या विक्रीसंदर्भात विधानसभेत आमदार अमित साटम, आशिष शेलार आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. वरळीतील रहिवासी असलेली ज्युलिया फर्नाडिस ही ‘अहम’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवत असून या संस्थेच्या माध्यमातून तसेच आयव्हीएफ सेंटरसोबत संगनमत करून मुंबईत सात बोगस महिला डॉक्टर आरोपी असलेली सायराबानो शेख ही चालवत असलेले क्लिनिक एम. ईस्ट वॉर्डच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सील केले आहे.
तसेच ज्युलिया फर्नाडिस चालवत असलेल्या ‘अहम’ संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त धर्मादाय आयुक्तांना विनंती करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे. दरम्यान, आरोपी १० लाखांत नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट चालवत असून गेल्या वर्षीही त्यांना १७ दिवसांच्या बालकांची विक्री करताना रंगेहाथ पकडले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बालकांच्या चोरीप्रकरणी ज्युलिया फर्नाडिस या महिलेचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून तिच्या विरुद्ध विविध ६ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित दाखल गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.