गोंदिया : ओबीसी नेते छगन भुजबळ यांना भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलावून सांगितले की, तुम्ही जामिनावर आहात, त्यामुळे आक्रमक व्हा. म्हणून भुजबळ हे आक्रमक झाले आहेत, असं खळबळजनक वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. भास्कर जाधवांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सामाना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्यावर भुजबळ यांनी अगदी आक्रमक होऊन भाष्य केलं. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये या सरकारचे आरोग्य नागरिकांनी बिघडवावे, असे आवाहन ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. गोदिंया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आरोग्य व्यवस्थांसंदर्भात विचारणा केली. त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याकडे या सरकारचे अजिबात लक्ष नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2024 च्या निवडणुका आता जवळ आल्या असून प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गोंदिया मतदारसंघावर आमदार भास्कर जाधव यांनी दावा केला असून 2024 च्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार लढवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.