Anna Hazare : मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर झालं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. हे विधेयक मंजूर केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
ठाकरे सरकारला लोकायुक्त कायदा नको होता. देवेंद्र फडणवीस यांनी वेळ लावला पण कायदा केला, असे अण्णा हजारे म्हणाले. मागील अधिवेशनात प्रलंबित राहीलेलं लोकायुक्त विधेयक या विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारचे आभार मानले. ठाकरे सरकारने केवळ आश्वासन दिलं पण कायदा केला नाही, असा टोला देखील अण्णा हजारे यांनी लगावला.
हे विधेयक मंजूर झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. या जनहित विधेयकाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करून ते मंजूर करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
लोकायुक्त नेमणुकीसाठी देशपातळीवर मोठं आंदोलन उभं करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना मुख्यमंत्र्यांनी फोन करून यासंदर्भातली माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी करताच अण्णा हजारेंनीही त्याला हसून दाद दिली. “तुमचा एवढा आग्रह होता. आपली तशी चर्चाही झाली. सध्या एवढी आंदोलनं चालू आहेत. त्यात तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच अण्णा हजारेंनी त्यावर हसून दाद दिली.