सागर जगदाळे
भिगवण(पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती विशेष अनुदानातून भिगवण येथील जि. प. प्राथमिक शाळेसाठी १२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. सदर कामाचे भूमिपूजन सरपंच दिपीका क्षीरसागर आणि उपसरपंच मुमताज शेख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.
शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असून खोल्यांचे पत्रे नवीन टाकणे, बांधकाम प्लॅस्टर, रंगकाम, बोलक्या भिंती, लाईट फिटिंग आणि इतर कामे होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी शैक्षणिक इमारत तयार करून शाळा अद्ययावत होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा देखील बसविली जाणार आहे.
यावेळी बोलताना सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक काळात शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी इमारत तसेच पायाभूत सुविधा चांगल्या असल्या पाहिजेत त्यामुळे विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी निर्माण होऊन तो अध्ययनास प्रवृत्त होईल.
या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच दिपीका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, संजय देहाडे, अशोक शिंदे, प्रा. तुषार क्षीरसागर, जावेद शेख, गुराप्पा पवार, शहाजी गाडे, दत्ता धवडे मुख्याध्यापिका कानडे, सीमा धालपे, शाळा समितीचे सदस्य आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.