Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री होतील, असं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं फोनवर म्हटलं आहे. पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला होता. या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं रतन टाटा यांचं नाव घेऊन धमकी दिली. यानंतर पोलीस कंट्रोल रूममध्ये मोठी खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक मदतीनं आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीनं कॉलरचा शोध घेतला असता, त्याचं लोकेशन कर्नाटक असल्याचं समजलं. त्यानंतर धमकी देणाऱ्याचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुण्याचा रहिवासी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ पुण्यातील घरी धाव घेतली असता आणखी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली.
धमकीचा फोन करणारी व्यक्ती गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या पत्नीनी पोलिसांनी दिली. एवढाच नाही तर, सदर व्यक्तीच्या पत्नीनं यासंदर्भातील तक्रार पोलिसांत केल्याचंही समोर आलं. चौकशीदरम्यान, कॉलरला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता आणि त्यानं कोणालाही न सांगता घरून फोन घेतला आणि त्याच फोनवरून त्यानं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन केला आणि रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला.
दरम्यान, सदर व्यक्ती मानसिक आजारी आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. त्यानं फायनान्समध्ये एमबीए केलं असून अभियांत्रिकीचंही शिक्षण घेतलं असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.