उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तिघांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी केलेली ही ९९ वी कारवाई ठरली आहे.
वैभव उर्फ गोट्या राजाराम तरंगे (वय २० रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली), सागर अरुण सिन्हा (वय १९, रा. उरुळी कांचन), यश लोणारी (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केलेल्या तिघांची नावे आहेत. या कारवाईने परिसरातील सर्वच गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबरला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात एका २५ वर्षीय तरुणाच्या हातातून मोबाईल घेऊन प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वैभव उर्फ गोट्या राजाराम तरंगे व त्याच्या साथीदारांवर गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत माजविणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ चे आर. राजा यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. रंजनकुमार शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोक्का कारवाईस मान्यता दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख हे करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, शिवशांत खोसे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार तेज भोसले, संदीप घनवटे, आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली.