egg price increase : मुंबई : दरवर्षी थंडीत अंड्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असते. मात्र यावेळच चित्र काहीस भयानक आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारटा वाढला असून थंडीमुळे अंड्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. तर प्रति डझन अंड्यांच्या दरात सहा ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाल्याने रविवारपर्यंत 80 ते 84 रुपये डझन दराने विकली जाणारी अंडी आता थेट 94 रुपये डझन दराने विकली जात आहेत. थंडीचा जोर वाढू लागल्याने यंदा अंड्यांच्या दरात छप्पडफाड वाढ झाली आहे.
अंधेरी लोखंडवाला, जोगेश्वरी पश्चिम आणि शिवाजी पार्कमध्ये सोमवारी अंड्यांचा दर डझनामागे 6 ते 10 रुपयांपर्यंत वाढून 90 रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर वांद्रे, मालाड, नेरुळमध्ये अंड्यांचा दर 80 रुपये डझन सुरु होता. अंडी कडाडल्याने घरगुती, बेकर्स, मिठाईवाले, संस्थागत खरेदीदार आणि हॉटेल्स यांना सर्वांना दरवाढीचा बोजा पडणार आहे.
अंडी महागल्याने सर्वसामान्यांचा प्रोटीनयुक्त आहार महागला आहे. कोरोनाकाळात अंड्यांना सर्वाधिक मागणी होती. कारण अंड्यांमुळे आरोग्यात सुधारणा होत असल्याने अंड्यांना प्रचंड मागणी वाढली होती. जानेवारी 2023 महिन्यांत पहिल्यांदाच अंड्याचे दर 90 रुपयांपर्यंत पोहचले होते. मंगळवारच्या राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने किरकोळ दर 78 रुपये प्रति डझन असल्याचे जाहीर केले आहे. परंतू वाहतूक आणि मजूरीच्या खर्चामुळे दुकानदार साधारण 6 ते 10 रुपये जादा आकारतात.
अंड्यांचा भाव कडाडला असताना दुसरीकडे भाज्यांचा भाव मात्र घसरला आहे. गेल्या महिन्यात 80 ते 100 रुपये किलो असलेल्या हिरव्या मटर शेंगा 25 ते 30 रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. बाजारात सध्या हिरव्या वाटाण्याच्या शेंगा आणि गाजराची आवक वाढली आहे. लाल गाजर 20 ते 40 रुपये किलो, तर वाटाण्याच्या शेंगांना 25 ते 30 रुपये किलोचे दर आहे. आवक वाढल्यास दरात पुन्हा घसरण होईल असे म्हटले जात आहे.