पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला उद्या गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बुधवारी (ता.२१) पुण्यात येणार आहेत.
दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपने १४४ जागा निश्चित केल्या आहेत. त्यातील १६ जागा राज्यातील आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा प्रस्तावित आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. तीन दिवसीय दौऱ्यात २१ कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. परिवार सन्मान बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, मंडल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिकाऱ्यांशी संवाद सीतारामन साधणार आहेत.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठकही शनिवारी (ता.२४) घेणार आहेत.