मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायन रुग्णालयातील टॉयलेटमध्ये एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जन्मत:च त्या मुलीला रुग्णालयातील टॉयलेटमधील कचऱ्यात फेकून दिले गेल. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवजात बालिका टॉयलेटमध्ये सापडल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. डॉक्टरांच्या टीमने धाव घेऊन तातडीने तिची तपासणी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे मुलीला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळताच सायन पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयातील सफाई कर्मचारी सरस्वती डोंगरे ( वय 36) या सकाळी पावणे सातच्या सुमारास त्या रुग्णालयातील अपघात विभागातील टॉयलेटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी गेल्या. त्यांना तेथे असलेली कचऱ्याची बादली नेहमीपेक्ष खूपच जड वाटली. त्यांनी ती नीट उघडून पाहिली असता, त्यात नवजात अर्भक आढळले. एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ते होते.
त्यांनी या गोष्टीची माहिती तातडीने त्यांच्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांनी त्या नवजात बाळाला बाहेर काढून तातडीने तिची तपासणी केली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती शीव पोलिसांना दिली. मुलीचा घातपात केला का? कोणी केला? कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.