बीड : बीड जिल्ह्यात जमिनीच्या वादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जागेच्या वादातून उद्भवलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच मामांनी भाच्याचा दगडाने ठेचून आणि काठ्यांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळ असलेल्या मोंढा रोडवर ८ डिसेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७. रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल आहे.(Beed Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेंद्र कळसे आणि त्यांचे मामा लाड पवार कुटुंबीय यांच्यात जागेच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून शुक्रवारी सकाळी राजेंद्र कळसे हा शिवाजी महाराज चौक परिसरात असतानाच त्याचे मामा राम माणिकराव लाड-पवार, लक्ष्मण माणिकराव लाड-पवार, भारत माणिकराव लाड पवार, बजरंग माणिकराव लाड-पवार, शत्रुघ्न माणिकराव लाड पवार या पाचजणांनी एकत्रित येऊन दगडाने ठेचून आणि काठीने मारहाण करत डोकं फोडलं.
या घटनेत राजेंद्र कळसे हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. स्थानिक नागरिकांन उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Beed Murder Case)
या प्रकरणी राजेंद्र कळसे याची पत्नी आशा राजेंद्र कळसे हिच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारत माणिकराव लाड पवार या आरोपीला अटक केली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक विनोद घोळवे करत आहेत. दरम्यान, भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.