पुणे : हिवाळी हंगामात थंड वारे आणि सतत घसरणारे तापमान यामुळे निरोगी लोकही आजारी पडू शकतात. अशा परिस्थितीत, आपण उबदार कपडे घालणे, स्वच्छ अन्न खाणे आणि सुरक्षिततेसाठी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: घरी लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे ज्युपिटर हॉस्पिटल येथील श्वासरोग विशेषज्ञ डॉ. सुश्रुत गणपुले म्हणाले.
पुढे बोलताना डॉ. सुश्रुत गणपुले म्हणाले, हिवाळा हा प्रवास आणि मौजमजा करण्यासाठी उत्तम ऋतू असला, तरी काही लोकांसाठी त्रासदायक ठरतो. ज्यामध्ये लहान मुले, वृद्ध लोक आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोकांना याचा त्रास होतो. त्यामुळे बदलत्या हवामानात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे असे डॉ. गणपुले म्हणाले.
हिवाळ्यामध्ये या समस्यांना सामोरे जावे लागते
हिवाळ्यामध्ये लहान मुले, वृद्ध लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, ऍलर्जी, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन अशा समस्यांनाचा सामना करावा लागतो. तसेच दाट धुके आणि प्रदूषण असेल तर समस्या आणखीचा वाढतात. जर अशावेळी आपण काळजी घेतली नाही तर आजरी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे बीपी, दमा आणि न्यूमोनिया सारखे आजार होऊ शकतात.
अशी घ्या काळजी
- लहान मुले आणि वृद्धांना नेहमी उबदार कपडे घालण्यास द्यावेत. काम असेल तर घराबाहेर पाठवावे.
- लहान मुले आणि नवजात बालकांना बाहेर घेऊन जाताना सुती कपडे, लोकरीच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच हातासाठी
- ग्लोव्ह्ज आणि पायात मोजे वापरावे.
- तर वृद्धांना नेहमी उबदार कपडे घालण्यास सांगावे. त्यांना आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
- काहीजण मॉर्निंग वॉक करत असतील ते त्यांना सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात जाण्यास सांगावे.
लहान मुले आणि वृद्ध यांनी ‘या’ गोष्टीचे सेवन करावे
लहान मुले असोत की वृद्ध, त्यांना कपड्यासोबतच उबदार ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी द्याव्यात. ताजी फळे द्यावीत, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जेवणात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, दूध, अंडी, रस आणि फायबर याचा समावेश करावा. समृद्ध आहार त्यांना शरीरात आतून उबदार आणि मजबूत बनवेल, असे डॉ. सुश्रुत गणपुले यांनी सांगितले.