लोणी काळभोर(पुणे) : कानात हेडफोन लावून रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या एका तरुणाला वंदे भारत एक्स्प्रेसने चिरडल्याची धक्कादायक घटना लोणी स्टेशन (ता.हवेली) येथे गुरुवारी (ता.०७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोलापूरच्या दिशेकडे भरधाव वेगाने चाललेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ने तरुणाला चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईहून सोलापूर व सोलापूरहून पुन्हा मुंबईच्या दिशेने वंदे भारत एक्स्प्रेस ही दैनंदिन प्रवासी फेऱ्या मारते. नेहमीप्रमाणे वंदे भारत एक्स्प्रेस गुरुवारी सोलापूरच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, लोणी स्टेशनयेथे कानात हेडफोन घालून एक तरुण गाणी ऐकत रेल्वे लाईन क्रॉस करत होता. कानात हेडफोन असल्याने तरुणाला गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला नसल्याने भरधाव वेगाने चाललेल्या वंदे भारत एक्स्प्रेसने तरुणाला चिरडले. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वंदे भारत एक्स्प्रेसच्या चालकाने रेल्वे प्रशसनाला दिली. घटनेची माहिती मिळताच, लोणी लोहमार्ग पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक बी. के. ओझा आणि हवालदार के. बी. देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शाहिद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशनशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली.
दरम्यान, आझादसिंग टाक, वीरेंद्रसिंग टाक, रामा नरवडे हे रुग्णवाहिका घेऊन तातडीने मदतीसाठी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन, शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लोहमार्ग पोलीस करत आहेत.
अनोळखी तरुणाचा बांधा सडपातळ असून चेहरा लंबकुळा व रंग गोरा आहे. त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ असावे. अशा वर्णनाचा तरुण जर कोणाच्या ओळखीचा असेल तर नागरिकांनी लोहमार्ग पोलिसांशी 9764110382 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन रेल्वे पोलीस हवालदार सुरेश शेलार यांनी केले आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झालेल्याचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच आता कानात हेडफोन घालून गाणी ऐकत ट्रॅकवरून जाण्याचे फॅड तरुण वर्गामध्ये जास्त आहे. यालाच हा अपवाद म्हणून एक तरुणाचा बळी गेला असून त्याने तरुण वयातच आपली जीवनयात्रा संपवली आहे.