मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांनी टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत आपलं स्थान मिळवलं आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 12.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 10,25,40,18,00,000 रुपयांनी वाढून 82.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी हे 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. अदानींनी कमाईच्या बाबतीत इतर सर्व श्रीमंतांना मागे टाकले. ते आता श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींपेक्षा फक्त दोन स्थानांनी मागे आहे. या यादीत अंबानी 13 व्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती 91.4 अब्ज डॉलर आहे. आशियामध्ये अंबानी पहिल्या तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आता दोघांच्या संपत्तीत केवळ 8.9 अब्ज डॉलर्सचा फरक आहे.
टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. ते 222 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.25 अब्ज डॉलरने वाढली. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस या यादीत 171 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.