black hair : मुंबई : बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषित वातावरण यांमुळे केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. केस पांढरे होणे आजकाल सामान्य झाले आहे. आपल्यापैकी बरेच जण केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी इंटरनेटवर उपाय शोधत असतात. अशा वेळी काही जण आवळा, भृंगराज पावडर, खोबरेल तेलासह अनेक उपाय सुचवतात; पण त्यामुळे अकाली केस पांढरे किंवा राखाडी होण्याची समस्या खरेच दूर होते का? या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खारमधील नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील त्वचारोग तज्ज्ञ व ट्रायकोलॉजिस्ट डॉ. वंदना पंजाबी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
केस पांढरे किंवा राखाडी होण्यामागची कारणे काय?
अल्ट्राव्हायोलेट किरण, प्रदूषण, शारीरिक बदल, मद्यपान, धूम्रपान आणि जुनाट आजार यांचा परिणाम म्हणून ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो. जो केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकतो. व्हिटॅमिन बी 12 आणि डी 3, कॉपर, लोह व कॅल्शियमची कमतरता, थायरॉईड, केमोथेरप्युटिक औषधे, बैठी जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांसारख्या इतर कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात, असे डॉ. पंजाबी यांनी नमूद केले.
केस पांढरे आणि राखाडी न होण्यासाठी हेअर पॅक
१) भृंगराज पावडर – २ टीस्पून
२) आवळा पावडर – १ टीस्पून
३) तांदळाचे पाणी किंवा रोझमेरी
४) खोबरेल तेल – १ टीस्पून
हेअर पॅक वापरण्याची पद्धत अशी की, सर्व साहित्य आवश्यक प्रमाणात घेऊन मिक्स करा. केस धुण्याच्या एक तास आधी हा हेअर पॅक वापरा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तो केसांवर वापरा.
हेअर पॅक उपयुक्त ठरतो का?
आवळा, भृंगराज पावडर, खोबरेल तेलासह काही घटक मिक्स करून बनवलेला हेअर पॅक केसांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. तसेच केसांचा रंग टिकवून ठेवण्यातही त्यातील प्रत्येक घटक अद्वितीय गुणधर्म प्रदान करतात, असे जाणकार सांगतात.
भृंगराज केसांच्या वाढीस मदत करते. ते केस अकाली पांढरे होण्यापासून रोखते आणि केसांच्या मुळांना पोषण देते. याशिवाय टाळूमध्ये रक्तप्रवाहाचे कार्य सुधारते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे सर्वाधिक प्रमाण आहे. जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते आणि केस मजबूत करते. त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्यास मदत करु शकते. ज्यामुळे केस अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून दूर राहता येते.
रोझमेरी तेलाचा वापर अनेकदा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, केसांच्या मुळांचे पोषण वाढवण्यासाठी आणि केस पातळ होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो.
खोबरेल तेल हे एक लोकप्रिय नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे केसांमधील प्रथिने कमी होण्यास प्रतिबंध करते. केस मजबूत आणि निरोगी ठेवते.